सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घरकुल व सिंचन विहीर योजनांच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती अनिता सुरेश बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात ग्रामविकास अधिकारी व रोजगार सेवकांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आली.
या बैठकीमध्ये सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या घरकुल व सिंचन विहीर योजनांच्या कामांची सद्यस्थिती, मंजूर कामे, प्रलंबित कामे, पात्र लाभार्थी तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
प्रत्येक गावातील योजनांची प्रगती तपासून ज्या ठिकाणी कामे संथ गतीने सुरू आहेत, त्या कामांना तातडीने गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. विशेषतः नवीन घरकुल व सिंचन विहीर योजनांमध्ये जी राम जी योजना अंतर्गत लाभ घेऊ इच्छुक लाभार्थ्यांनी सूचविलेल्यि कामांचे जिओ-टॅगिंग व मॅपिंगची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे
निर्देश सभापती सौ. अनिता बनकर यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी व रोजगार सेवकांना दिले.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कोणत्याही कारणास्तव कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रशासकीय प्रक्रिया व तांत्रिक बाबी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच मंजूर झालेल्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेळेत होऊन लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळणे आवश्यक असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.
घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व पात्र कुटुंबांना हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे, तसेच सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेती उत्पादनाला चालना देणे, हा शासनाच्या योजनांचा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे या योजनांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन सभापती अनिता सुरेश बनकर यांनी केले. तालुक्यातील घरकुल व सिंचन विहीर योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि मंजूर कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी पंचायत समिती स्तरावर नियमितपणे आढावा घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी उपसभापती भगवान आहेर, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, रोजगार सेवक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















